सांगली - शस्त्रांची तस्करी करणाऱ्या एका टोळीला मीरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून तीन देशी कट्टे आणि सहा जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. मीरज-पंढरपूर रोडवरील तानंग फाटा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. गौस उर्फ निहाल मोमीन (23) रा. इदगाह माळ, मीरज, सुरेश हत्तेकर (29) रा. सुभाषनगर, मीरज आणि तौफिक शेख (21) रा. इदगाह, मीरज, अशी या टोळीतील तीघांची नावे आहेत.
मीरज-पंढरपूर रोडवर कारवाई -
मीरज-पंढरपूर रोडवरील तानंग फाटा या ठिकाणी काही व्यक्ती शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचत तीघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, पोलिसांनी देशी बनवटीचे पिस्तूल, सहा जीवंत काडतुसे आढळून आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी चारचाकी गाडीसह एकूण 3 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.