सांगली - चीनच्या हल्ल्यास जवाबदार कोण? असा सवाल करत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेवर टीका केली आहे. तसेच एकीकडे चीनच्या पंतप्रधानांबरोबर केंद्र सरकारचा मेजवानीचा कार्यक्रम झाला असताना, हा हल्ला झालाच कसा, असा सवालही मंत्री कदम यांनी उपस्थित केला. सांगलीमध्ये काँग्रेसकडून चीन हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
चीन हल्ल्यातील हुत्मात्मा झालेल्या भारतीय जवानांना सांगलीत काँग्रेस पक्षाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत आणि चीनमध्ये सुरू असणाऱ्या युद्धामध्ये गलवाण सीमेवर अनेक जवानांना चीनच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले आहे. या जवानांना काँग्रेस पक्षाकडून सांगलीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी उपस्थिती लावत भारताच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मंत्री कदम यांनी जवानांना श्रद्धांजली वाहत, केंद्र सरकारवर टीका केली आहे. झालेल्या हल्ल्याबद्दल खंत व्यक्त करत, या हल्ल्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला. हा हल्ला होत असताना केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला याची माहिती कशी मिळाली नाही? असा सवालही मंत्री कदम यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर एका बाजूला चीनचे पंतप्रधान केंद्र सरकारच्या बरोबर मेजवानी करतात आणि दुसऱ्या बाजूला चीनकडून हल्ला होतो. हे कसे असा सवालही मंत्री कदम यांनी उपस्थित केला आहे.