सांगली - स्वाभिमानीच्या राजू शेट्टींना दूध संघ आणि कारखानादार आर्थिक मदत करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. चार लाखांचा निधी निवडणुकीसाठी जमा झाला, हेच विरोधकांसाठी पुरेसे उत्तर असल्याच्या टोला राजू शेट्टींनी लगावला होता.दूध संघवाले आणि कारखानदार शेट्टींना मदत करत आहेत. त्यामुळे '४ लाख काय, ४ कोटी पण मिळतील,'असा टोला रघुनाथ पाटलांनी शेट्टी यांना लगावला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले मतदार संघातील लोकसभा निवडणुकीवरून राजू शेट्टी आणि रघुनाथ पाटील यांच्यात जुंपली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच या मतदारसंघात संघातील उमेदवार राजू शेट्टी आणि रघुनाथ पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपला सुरवात झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटने रघुनाथ पाटील यांनी हातकणंगले मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर करत शेट्टींनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता . त्याला प्रत्युत्तर देताना खासदार शेट्टींनी सांगितले, की आपण शेतकऱ्यांची फसवणूक केली असती, तर निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्याआधी ४ लाखांचा निधी जमा झाला नसता.
यावर रघुनाथ पाटलांनी पलटवार करत सांगितले, की देशातला आणि राज्यातला शेतकरी गलितगात्र झाला आहे. अशास्थितीत शेतकरी तुम्हाला मदत करतो, ही गोष्ट न पटणारी आहे. तसेच दूध उत्पादक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये राजू शेट्टींनी दूध व साखर कारखानदारांना मिळवून दिल्याचाही आरोप पाटील यांनी केला. आता तेच दूध संघवाले आणि कारखानदार मदत करत आहेत. त्यामुळे ४ लाख काय, ४ कोटी पण मिळतील. असा टोला रघुनाथ पाटलांनी शेट्टी यांना लगावला आहे.