सांगली - महानगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेल्या परवाना शुल्क विरोधात मदनभाऊ पाटील युवा मंचकडून आंदोलन करण्यात आले आहे. युवामंचच्या पदाधिकारी आणि सभासदांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर नगरसेवकांना पुष्पगुच्छ देवून गांधीगिरी करत परवाना शुल्क रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सांगली महानगरपालिकेच्यावतीने पालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी पालिकेचे विविध परवाने घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाचशे रुपयांपासून 28 हजार रुपयांपर्यंत परवान्यांचे शुल्क जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, या परवाना शुल्काला शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. बुधवारी या परवाना शुल्का विरोधात महासभेच्या पार्श्वभूमीवर मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - मनसेचे शॅडो कॅबिनेट म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा', सेनेचा खोचक टोला
महापुराने सांगलीतील व्यापारी उध्वस्त झालेला आहे. त्यातच पालिकेकडून हे जाचक परवाने आणि त्याचे जास्त शुल्क हा व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारा प्रकार आहे. त्यामुळे हे परवाना शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महासभेच्या पार्श्वभूमीवर उपस्थित राहणाऱ्या भाजप नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी करण्यात आली.