सांगली - महापालिका क्षेत्रातली बाजारपेठ आजपासून सुरू झाली आहे. पालिका प्रशासनाने सशर्त अटींवर दुकाने उघडण्यासाठी ही परवानगी दिलीय. एक दिवसाआड समोरा-समोरील दुकाने उघडण्याची आणि रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याची अट यामध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आलीय. ४ मे पासून मुख्य बाजारपेठ वगळता इतरत्र व्यापार,उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. महापालिका क्षेत्रातला व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पालिका क्षेत्रातील व्यापार सुरू करण्याचा इशारा दिला. त्यानंतर व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला. याप्रकरणी कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी मध्यस्थी करून समन्वय साधला. काही दिवसांनी महापालिका क्षेत्रातला व्यापार सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याप्रमाणे आज सोमवारपासून सांगली महापालिका क्षेत्रातला व्यापार सुरू झाला आहे. तब्बल दीड महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आजपासून सुरू झाली आहेत.
मात्र नियम आणि अटी घालून ही परवानगी देण्यात आली आहे. एक दिवसाआड एक दुकाने सुरू ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच समोरा-समोरील दुकाने चालू करण्याचे सांगण्यात आले आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर-दक्षिण अशी विभागणी करण्यात आली आहे. तसेच रविवारी सर्व व्यापार बंद ठेवण्याच्या अटींवर परवानगी देण्यात आलीय. सोशल डिस्टनस आणि अन्य काळजी घेण्याचे बंधन आहे. प्रशासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांना सील लावण्याच इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. मात्र तब्बल दीड महिन्याहून अधिक काळापासून बंद असल्याने नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत.