सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानानंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण होऊन कर्नाटकच्या बसेसवर निशाणा साधण्यात आला. परिणामी आता महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद (Maharashtra Karnataka Bus Service Stopped) झाली आहे. सांगली आगारातून जाणाऱ्या एसटी बस महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आणि कर्नाटकच्या बसेस कर्नाटकच्या सीमेपर्यंत धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना पायपीट करण्याची वेळ आली आहे.
तणाव वाढला : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Baswraj Bommai on Maharshtra) यांनी सांगलीचा जत तालुका आणि सोलापूरच्या अक्कलकोट येथील गावं कर्नाटकमध्ये येणार असल्याचे विधान केल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. ठिकठिकाणी कर्नाटक सरकार विरोधात आणि मुख्यमंत्री बसवराज यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. त्याच बरोबर कर्नाटक एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक आणि काळे फासण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक मधली बस सेवा बंद पडली आहे.
सांगली जिल्ह्यातून कर्नाटककडे जाणारी एसटी बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्नाटक मधून सांगली जिल्ह्यात येणारी एसटी देखील कर्नाटक आगारकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. सांगली आणि मिरज आगारातून सीमेवर असणाऱ्या म्हैसाळपर्यंत सांगली एसटी आगाराकडून बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. कर्नाटककडून कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड पर्यंत बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कर्नाटककडे जाणाऱ्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्र कडे येणाऱ्या बसमधील प्रवाशांना दोन-तीन किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागत आहे.