सांगली - बेळगावमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख्याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये एसटी आगाराकडून कर्नाटक राज्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच कर्नाटक राज्यानेही महाराष्ट्रातील बस वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे.
तणावाचा बस सेवांवर परिणाम
कन्नड रक्षिक वेदिक संघटनेकडून कर्नाटकच्या बेळगावमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख्याच्या गाडीवर हल्ला करत फलक फाडल्याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्र बस सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली एसटी आगाराकडून मिरजेतून आणि सांगलीतून कर्नाटक राज्याकडे जाणारी बस वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. एसटी बसचे नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक आगाराच्या एसटी फेऱ्या तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. रोज महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीच्या 25 फेऱ्या कर्नाटक राज्यात होत होत्या. त्या सर्व बंद करण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्यातून ही तितक्याच फेऱ्या महाराष्ट्रात होत होत्या त्यासर्व फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून नाईलाजाने त्यांना खासगी वाहतूकीवर अवलंबून रहावे लागत आहे.
हेही वाचा - जतमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
हेही वाचा - टाकाऊतून स्वछतेचा संदेश..! भंगारातील साहित्यापासून सांगलीत साकारले अनोखे 'उद्यान'