सांगली : जत तालुक्यातील माडग्याळ येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा आहे. या बँकेच्या शाखेत सोने गहाण ठेवून कर्ज काढण्यात आले आहेत. तेरा लाख रुपयांचे हे कर्ज घेण्यात आले आहे, मात्र कर्जापोटी दागिने गहाण ठेवण्यात आले होते. ते सोन्याचे दागिने बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलीस ठाण्यामध्ये बँकेचे मूल्यांकन करणारे सराफ सह आठ जणांच्या विरोधात बँकेची फसवणूक केल्याबाबत उमदी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
सोने बनावट असल्याचे समोर आले : याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीप्रमाणे, माडग्याळ या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. शाखेमध्ये श्रीकांत गोविंद हुवाळे, दिलीप सुखदेव सावंत, मच्छिंद्र शाहू सावंत, धुंडापा गावडे, शहाजी मारुती तुराई, अंकुश घोदे आणि सिद्धू शिंदे या सात जणांनी प्रत्येकी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. सात जणांनी मिळून एकूण 13 लाख 21 हजारांचे कर्ज घेतले आहे. मात्र जे सोने बँकेकडे ठेवण्यात आले आहे, ते बनावट असल्याचे समोर आले आहे. बँकेकडून सदरचे कर्ज देताना या बँकेचे मूल्यांकन आणि तपासणी ही माडग्याळ शाखेचे बँकेचे सुवर्णकार संजय सावंत यांच्याकडून करण्यात आली होती. या सोन्याच्या बाबतीत प्रमाणपत्र सादर झाल्यानंतरच बँकेकडून सात जणांना कर्ज वाटप करण्यात आले होते.
गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या : मात्र या सात जणांनी आणि सुवर्णकार सावंत यांनी एकमत करून बँकेत बनावट सोने हे गहाण ठेवले. त्याबाबतचे प्रमाणपत्र देखील सावंत यांच्याकडून मिळवले. दरम्यान सदर सोने दागिन्यांचे क्रॉस पडताळणी करण्यासाठी बँकेच्या दुसऱ्या सुवर्णकार श्रीशैल्य आरगोडी यांच्याकडे पाठवले असता, सदर 9 सोन्याचे दागिने बनावट असल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर माडग्याळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या वतीने सदर प्रकाराच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी सदर फसवणुकीच्या बाबतीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अधिक तपास सुरू आहे : त्यानुसार जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन श्रीकांत गोविंद हुवाळे, दिलीप सुखदेव सावंत, मच्छिंद्र शाहू सावंत, धुंडापा गावडे, शहाजी मारुती तुराई, अंकुश घोदे, सिद्धू शिंदे, मूल्यांकन करणारे सुवर्णकार संजय सावंत या आठ जणांच्या विरोधात बँकेची बनावट सोने गहाण ठेवून 13 लाख 21 हजारांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.
हेही वाचा : Ravikant Shukla Fraud : बिल्डरची क्रिकेटरला जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल