सांगली - क्रांतिवीर नागनाथ(अण्णा) नायकवडी यांच्या पत्नी श्रीमती कुसुमताई नायकवडी यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हुतात्मा समूहावर शोककळा पसरली आहे.
वाळव्याचे सुपुत्र स्वर्गीय पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पत्नी श्रीमती कुसुमताई नायकवडी (माई ) यांचे बुधवारी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने मिरज येथील मिशन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. क्रांतीवर नागनाथआण्णा यांच्या क्रांती कार्यात अखंड साथ देत अण्णांच्या पश्चात त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे काम कूसमताई यांच्याकडून सुरू होते.
पलूस तालुक्यातील ब्रम्हानंदनगर येथील पोस्टमास्तर यशवंत कदम यांच्या कुटुंबात 9 एप्रिल 1932 रोजी कुसुमताई यांचा जन्म झाला. 18 व्या वर्षी त्यांचा कोल्हापूर येथे सत्यशोधक पध्दतीने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्याशी विवाह झाला. यानंतर नागनाथ अण्णांनी कूसमताई नायकवडी यांना पदवीपर्यंत शिक्षण दिले. कोल्हापूर येथील श्री प्रिन्स मराठा फ्री बोर्डिंगमध्ये शिक्षणासाठी राहणाऱ्या कुसुमताई या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर मुलींना बोर्डिंगमध्ये प्रवेश सुरू झाला.बीएडचे शिक्षण सुरू असताना कुसुमताई नायकवडी यांनी शिक्षक म्हणून वाळव्याच्या जिजामाता विद्यालयात काम सुरू केले. त्या 1965 मध्ये शिवाजी विद्यापीठ येथून बी. एड.चे शिक्षण पूर्ण करून जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बनल्या.
धाडशी आणि रोखठोक स्वभावाच्या कुसुमताई या नागनाथअण्णा यांच्या चळवळीतही सहभागी असायच्या नागनाथ अण्णांच्या साराबंदी, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त या चळवळीत माईंचा हिरिरीने सहभाग असायचा, हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता. या कारखान्याच्या पाहिल्या महिला संचालक होण्याचा बहुमान कूसमताई यांना मिळवला होता. हुतात्मा शिक्षण संकुलाच्या मार्गदर्शकी आणि संपूर्ण जवाबदारी सांभाळन्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांची राहिली आहे. अनेक सामाजिक कार्यांत, कुसुमताई या अग्रेसर असायच्या, नागनाथ अण्णा यांच्या निधनानंतर अण्णांचे विचार पुढे घेऊन जाण्याची कामगिरी त्या अचूकपणे करत होत्या. त्यांच्या मागे हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, डाॅ सुषमा नायकवडी, सौ.नंदिनी नायकवडी, नातू गौरव नायकवडी,दोन मुली यांच्यासह मोठा परीवार आहे. गुरुवारी दुपारी वाळवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.