सांगली - कुरळप पोलिसांनी दोन अल्पवयीन मोटारसायकल चोरांना ताब्यात घेतले. दोघांकडून एक बुलेट आणि हिरो होंडा स्प्लेंडर गाडी जप्त करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी कणेगाव येथील बुलेट चोरीला गेल्याची तक्रार विकास शिंदे यांनी कुरळप पोलीस ठाण्याला दिली होती. त्यावरून या दोन अल्पवयीन चोरट्यांना पोलिसांनी सोनी भोसे येथून ताब्यात घेतले.
हे दोघे अल्पवयीन नवीन गाडी घेतल्याचे सांगून तीन दिवसापासून पाहुण्यांची दिशाभूल करत होते. तीन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील मंगराईवाडी व वडगाव येथील अल्पवयीन चोरट्यांनी वाळवा तालुक्यातील कणेगाव नवीन वसाहतमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरासमोर लावलेली बुलेट गाडी चोरी केली. या अल्पवयीन मुलांनी कणेगावमध्ये गाडी चोरण्याचा पाहिला प्रयत्न केला होता मात्र, गाडी लॉक असल्याने तो डाव फसला. पुढे जाऊन नवीन वसाहतमध्ये पोलीस अधिकाऱयाची गाडी त्यांनी पळवली. दुसऱ्या दिवशी आष्टा येथे बहिणीच्या घरी नवीन गाडी घेतल्याचे सांगून तिचे पूजनही केले. चोरट्यांनी युट्युबवरील व्हिडिओ बघून गाडीची चोरी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी बहिणीच्या घरी एक दिवस थांबून मिरज तालुक्यातील सोनी भोसे येथे मामाच्या घरी गेल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ सोनी भोसे येथे जाऊन गाडी सह या दोघांना ताब्यात घेतले. कुरळप पोलीस ठाण्यामध्ये या अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील करत आहेत. या दोन्ही अल्पवयीन आरोपींच्या घरची आर्थिक परस्थिती चांगली असून त्यांनी चैनीसाठी गाडी चोरल्याचे सांगितले आहे.