सांगली - जिल्ह्यातल्या सिंचन योजनेबाबत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण आज कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. जवळपास सव्वाशेहून अधिक सिंचन प्रश्नांच्या बाबतीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण यावेळी करण्यात आले.
जिल्ह्यातील टेंभू ताकारी म्हैशाळ वाकुर्डे बुद्रुक आणि आरफळ सिंचन योजना दुष्काळी शेतकऱ्यांना जरी योगदान ठरणाऱ्या असल्या तरी या सिंचन योजनांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पुढे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुनर्वसन, बाधित नुकसान, पाणी न मिळणे अशा अनेक तक्रारी आजही कायम आहेत. छोट्या स्वरुपात असणाऱ्या या तक्रारी वर्षानुवर्ष जलसंपदा विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली जिल्ह्यातल्या सिंचन योजनांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तक्रार निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले आणि इतर अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या आजच्या परिषदेमध्ये जिल्ह्यातुन जवळपास साडेतीनशे अर्ज दाखल झाले होते. यापैकी 125 प्रश्न या परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यात आले आहेत. वारली नदीच्या पाटबंधारे भवनमध्ये ही तक्रार निवारण परिषद पार पडली, यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंद पवार, महापालिकेचे नेते शेखर माने, दिगंबर जाधव, उपाध्यक्ष शंभूराज काटकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी ही उपस्थित होते.