सांगली - प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे मोठी खळबळ उडाली आहे, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे वितृष्ट निर्माण होणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
याबाबत मंत्री पाटील म्हणाले की, प्रताप सरनाईक यांनी काय पत्र पाठवले ते आपल्याला माहित नाही, मात्र आपण खासगीत अनेकदा ऐकले आहे की, प्रताप नाईक यांची भावना आघाडी टिकवण्याची आहे. तर शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये कोणी गेल्याची माहिती नाही, पण त्यांच्या मतदारसंघात तसा काही प्रयत्न झाला आहे का, हे तपासावे लागले. आपणास या प्रकरणाबाबत अद्याप पूर्ण माहिती नाही, त्यामुळे यावर बोलणे योग्य होणार नाही.
...तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवतील - पाटील
काँग्रेसकडून स्वबळावर निवडणुका लढवण्याचा दावा केला जात आहे, याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, आम्ही तीनही पक्ष एकत्र आहोत. जरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वेगळी भूमिका मांडत असले तरी देखील वेळ आल्यावर आम्ही तीनही पक्ष एकत्र निवडणुका लढवू. मात्र तरी देखील काँग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाची भाषा कायम ठेवल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवेल.
हेही वाचा - प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून किरीट सोमैयांची बोचरी टीका, म्हणाले...