जत (सांगली) - जत एस. टी. बसस्थानक आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव यांनी स्लीपर कोच एसटी बसची प्रवासी तिकीट आकारणी साध्या दराने केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात निलंबानाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे महामंडळाचे 51 हजार रुपयांचे अर्थिक नुकसान झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळे जत एस. टी. आगारातील कर्मचाऱ्यांच्यात खळबळ माजली आहे.
एसटी महामंडळाचे ५१ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट -
याबाबत अधिक माहिती अशी की, विरेंदर होनराव हे जत येथे आगार व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. स्लिपरकोच जत ते मुंबई एसटी बस येथून सुरू आहे. मुंबई ते जत परत आल्यानंतर ही स्लिपरकोच एस.टी. बस जत ते विजापूर, जत ते तुळजापूर दरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी सुरू करन्यात आली होती. त्याचा तिकीट दर स्लिपरकोचचा न घेता साध्या दराने घेऊन एसटी महामंडळाचे ५१ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या नंतर त्यांच्या विरोधात आज निलंबनाची कारवाई करण्यात आली.
स्लिपरकोच एसटी बस जत ते मुंबई दरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी महामंडळाने दिली असताना तिचा वापर त्यांनी इतर ठिकाणी केला होता. या संदर्भात कर्मचारी संघटना व काही प्रवासी नागरिकांनी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करून विरेंद्र होनराव यांची चौकशी केल्यानंतर ते चौकशीत दोषी आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.