सांगली - प्रेयसीला लपवल्याचा रागातून प्रियकराने प्रेयसीच्या वडिलाचा सुपारी देऊन रचलेला खुनाचा कट इस्लामपूर पोलिसांनी उधळून लावला आहे. सुमारे ४० हजारांचे सुपारी देऊन हा खुनाचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सुपारी देणाऱ्या प्रियकरासह ६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
सांगलीच्या इस्लामपूर येथील सेवानिवृत्त बँक अधिकारी प्रल्हाद कुंभार यांच्या खुनाचा कट रचण्यात आलेला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस हवालदार दीपक ठोंबरे व सुरेश नलवडे हे पेट्रोलिंग करत होते. दरम्यान वाघवाडी रोडवर कराड येथील ६ जण संशयितरित्या दिसून आले. त्यांनी ताब्यात घेतले असता त्यांचाकडे घातक शस्त्र आढळून आले. या सर्वांची सखोल चौकशी केली असता मॉर्निग वॉकसाठी येणारे प्रल्हाद कुंभार यांना मारण्याचा कट होता. आणि यासाठी 40 हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मूळ इस्लामपूर येथील व सध्या कराड (जिल्हा सातारा) येथे वास्तव्यास असणारा सुशांत शिंदे याने ही सुपारी दिल्याचे समोर आले आहे. सुशांत शिंदे हा प्रल्हाद कुंभार यांच्या मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. ६ मे २०१९ रोजी मुलगी बेपत्ता झाली. प्रल्हाद कुंभार यांनी मुलीला कोठेतरी लपवून ठेवल्याचा राग सुशांत शिंदे यांच्या मनात होता. त्यामुळे कराड येथील विनल कंटे, सुरज घारे, तुषार बोरगे, मनोज विभुते, निरंजन मानकर यांना प्रल्हाद कुंभार यांचा खूनाची सुपारी सुशांतनी दिली. मात्र इस्लामपूर पोलिसांनी हा खुनाचा कट उधळून लावत या सर्वांना अटक केली आहे. इस्लामपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. या टोळीतील बहुतांशी जणांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत.