सांगली - अवघ्या ४ दिवसांच्या 'नकोशीने' जगण्यासाठी फोडलेला टाहो, तिला जीवदान देणारा ठरला आहे. मिरजेत एका 'नकोशीला' कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, दक्ष नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर मरण्यासाठी फेकण्यात आलेल्या या 'नकोशीला' जीवदान मिळाले आहे.
स्त्री भ्रूण हत्येचे कडक कायदे अस्तित्वात असले तरी, आजही कित्येक 'नकोशी'ला मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिले जाते. सांगलीच्या मिरजेत अशीच एक नकोशी जन्मानंतर, थेट मृत्यूच्या दारात सोडण्यात आली होती. मिरजेत बुधवारी रात्री कुपवाड रोडवरील निपाणीकर कॉलनी शेजारी असणाऱ्या एका रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ४ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळले. तिला कापडात गुंडाळून एका प्लॅस्टिक पिशवीत घालून कचाऱ्याच्या कोंडाळ्यात टाकण्यात आले होते. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाजा आला. त्यांनी त्याठिकाणी शोध घेतला असता एक नवजात बाळ दिसले.
यातील एकाने या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले यांनी या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, पोलिसांनी याठिकाणी पाचारण केले. यानंतर नागरिकांनी आणि मिरज पोलिसांनी मिळून या ४ दिवसांच्या अर्भकाला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या ही 'नकोशी' मिरजेच्या शासकीय रुग्णालयात असून तिच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. तीची प्रकृती सुखरूप आहे. तर, मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - प्रहार संघटनेकडून 'छत्रपतींचा सेवक' या नावाने मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
जिवंतपणे रस्त्यावर मरण्यासाठी फेकून देण्यात आलेल्या 'नकोशी'च्या पालकांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. वेळीच या 'नकोशीचा' आवाज दक्ष नागरिकांच्या कानी पडला, अन्यथा या निरागस नकोशीला भटक्या जनावरांच्या भक्ष्यस्थानी पडावे लागले असते. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे आजही समाजात 'नकोशीच्या' बाबतीत असणारा नकारात्मक दृष्टीकोन कायम आहे, हेच अधोरेखीत करून जातो, हे नक्की.
हेही वाचा - 'भाजप सरकारने दुर्लक्ष केल्याने सूतगिरणी उद्योग अडचणीत'