सांंगली - चांदोली धरण परिसरात गेल्या 24 तासात 95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी चांदोली धरणाच्या पाणी पातळीत 0.25 मिटरने वाढ झाली आहे. धरणात सध्या 11.51 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळपासून संततधार सरी कोसळत आहेत. धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.
मान्सूनच्या आगमनाच्या आगोदरच पावसाने शंभरी पार केली आहे. चांदोली परिसरात पहिल्यांदाच असे घडले आहे. निसर्ग चक्री वादळामुळे बुधवारी दिवसभराच्या आठ तासात तब्बल 75 मिलीमीटर पाऊस झाला होता. शासकीय नियमानुसार 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर ती अतिवृष्टी समजली जाते. बुधवारी आणि गुरुवारी धुंवाधार पावसामुळे या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
पावसामुळे शिराळा पश्चिम भागातील ठिकठिकाणच्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. धुळवाफेच्या भाताची पेरणी केलेल्या शिवारात पाणी तुंबले असल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. ऊसाला उपयुक्त असणारा हा पाऊस आंबा पिकासाठी मारक ठरला आहे. सध्या वाळवा शिराळा तालुक्यात पेरणीचे कामे आटोपली असून, हा पाऊस ऊस पीक व नव्याने टोकन केलेल्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे.