सांगली - मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते,अशी सुप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कुणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते, मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, पण शरद पवारांचा निर्णय हा आमच्या दृष्टीने अंतिम आहे, असे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये मुलाखती दरम्यान बोलत होते.
मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते..
इस्लामपूरमध्ये एका स्थानिक केबल वाहिनीच्या उद्घाटन प्रसंगी दिलेल्या मुलाखतीत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री होण्याचे सर्व गुण आहेत, पण तरीही मुख्यमंत्री पद हुलकावणी देत आहे, असं वाटत नाही का किंवा मुख्यमंत्री व्हावेसे वाटत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर जयंत पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखविली. आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आलेले नाही. तसेच प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. तसे मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, पण आमच्या पक्षात पक्ष आणि शरद पवार जो निर्णय घेतली तो अंतिम असतो, असे स्पष्ट करत आपल्या मनातील सुप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
पक्ष वाढविणे महत्वाचे
दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कुणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले. पक्ष व आमदारांची संख्या वाढविणे. तसेच आमच्या पक्षाकडे सध्या हे पद नाही. प्रथम पक्ष व आमदारांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतर पवारसाहेब जो निर्णय देतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल तसेच मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जास्त भावते, अशी भावनाही जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - शरद पवार यांची तपश्चर्या आणि साधना देशाला पुढे घेऊन जाणारी - जयंत पाटील