सांगली - कृष्णा नदीने अखेर धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोका पातळी 45 फूट इतकी आहे. मात्र, सध्या कृष्णेची पाणी 49 फूट इतकी पातळी झाली आहे. त्यामुळे कृष्णेच्या पुराचे पाणी शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. टिळक चौक आणि मारुती चौक याठिकाणी पुराचे पाणी पोहोचले आहे. त्याचबरोबर पूरपट्ट्यातील आणखी भागातील शेकडो घरे पाण्याखाली गेले आहेत. तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची शेकडो गावेही पाण्याखाली गेले आहेत.
पुराचे पाणी शिरले बाजारपेठेत -
संततधार पाऊस कोयना धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीला पूर आला आहे. आज सकाळी कृष्णा नदीने सांगलीतील धोका पातळी ओलांडली आहे. 45 फूट ही धोका पातळी असून 9 वाजता कृष्णेची पाणी पातळी ही 49 फूट झाली आहे. तर कृष्णेच्या पुराचे पाणी आता नागरी वस्तीबरोबर शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. शुक्रवारी मगरमछ कॉलनी, दत्त नगर, काका नगर आणि सूर्यवंशी प्लॉट याठिकाणी असणारे घरांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे 150 हुन अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. तर शनिवारी पुराचे पाणी हे शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. टिळक चौकपासून हरभट रोडपर्यंत तसेच मारुती चौकपासून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरातील दुकानांपर्यंत पुराचे पाणी येऊन पोहोचले आहे.
पुराच्या धास्तीने नागरिकांचे स्थलांतर सुरू -
त्याचबरोबर पूर पट्ट्यातील आणखी घरे आता पुराच्या विळख्यात सापडली आहेत. गुरुवार पासून येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जवळपास 500 हून अधिक कुटुंबांचे आतापर्यंत स्थलांतर झाले आहे. तसेच शहरातील इतर भागात ज्या ठिकाणी 50 फूट पातळी झाल्यास पाणी येते त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी आपली घरे खाली करत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तर शहर नजीकच्या वारणा आणि कृष्णा नदीचे संगम असणाऱ्या हरिपूर गावातील 80 टक्के नागरिकांना स्थलांतर केले आहे.
हेही वाचा - रायगड दरड दुर्घटना अपडेट : आतापर्यंत 44 मृतदेह आढळले; अद्याप 41 जणांचा शोध सुरुच
जिल्ह्यातील शेकडो गावे पुराच्या विळख्यात -
त्याचबरोबर वारणा आणि कृष्णा काठच्या शिराळा, मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्यातील शेकडो गावात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील हजारो नागरिकांना जनावरांसह स्थलांतर केले आहे. तर वारणा आणि कृष्णेच्या पुरा मुळे नदी काठची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. तर मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाची 3 पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत. तर कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 52 फुटांवर जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.