सांगली - शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन धरण ७२ टक्के भरले आहे. दहा वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात धुवाँधार पाऊस पडला आहे. चांदोली धरणक्षेत्रात तब्बल २३० मिलिमीटर इतकी विक्रमी पाऊसाची नोंद झाली आहे. धरणाच्या गेल्या दहा वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक पावसाची नोंद आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी चोवीस तासात तब्बल सव्वा तीन मीटरने वाढली असून धरणात २.३४ टीएमसी पाणी वाढले आहे. चोवीस तासात तब्बल अडीच टीएमसी पाणी वाढल्यामुळे धरणात आता २४.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ७१.८० टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन दिवसांतच सांडवा पातळीवरून पाणी वाहनाची शक्यता आहे. दरम्यान चांदोली परिसरात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे वारणा नदीची पाणी पातळीही वाढली आहे.