सांगली - शहरासह कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात वादळी वारा आणि गारांसह जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून गेले आहेत. मात्र, पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातल्या, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात आज पावसाचे जोरदार आगमन झाले. शुक्रवारपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आज(रविवारी) सायंकाळनंतर जोरदार पाऊस बरसला. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोन याठिकाणी गारांचा पाऊस पडला. तासगावच्या करोली (एम), मनेराजुरी परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले, झाडे उन्मळून पडली, गारांचाही मारा मोठ्या प्रमाणावर या भागात झाला. यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिरज तालुक्यातील लिंगणुर ,खटाव सह पूर्व भागातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. वादळी वाऱ्याने काही घरांचे पत्रे उडून गेले. दुसरीकडे सांगली परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसची संततधार झाली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना पावसाने दिलासा दिला आहे. या पाऊसमुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.