सांगली - जिल्ह्यातील पूरस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. त्यासाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. गरज पडल्यास मदतीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्यात येईल. पूरग्रस्तांनी घाबरू नये, त्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे आहे, असे पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले. देशमुख यांनी सोमवारी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला आहे. नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा वेढा घातला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. जिल्हा आणि सांगली महापालिका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. त्यांनी यावेळी पलूस तालुक्यातील भिलवडी, आमनापूर, धनगाव यासह सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी परिसरात भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे.
पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे जवळपास १३०० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच ४ हजाराहून अधिक जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. नागरिकांची अन्नाची, तर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासना देण्यात आल्या आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.
पुढील दोन दिवसात पुराची स्थिती आणखी गंभीर झाल्यास मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथक देखील दाखल झाली असल्याचे देशमुख म्हणाले. तसेच नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील देशमुख यांनी यावेळी केल्या.