सांगली - ऐन दुष्काळात सांगलीच्या तासगाव तालुक्याला जोरदार अवकाळी गारांच्या पाऊसाने मंगळवारी झोडपून काढले आहे. यामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. सुमारे अडीच हजार हेक्टर द्राक्षबाग क्षेत्र या गारांच्या तडाख्याने बाधित झाले आहे. आधीच दुष्काळाशी दोन हात करून मोठ्या हिमतीने टँकरच्या पाण्यावर जागवलेल्या बागा निसर्गाच्या आणखी एका संकटांमुळे अडचणीत सापडल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
दुष्काळाने सांगली जिल्हा होरपळत असताना तासगाव तालुक्यातील डोंगरसोनीसह पूर्व भागातील, सावळज, सिद्धेवाडी, वायफळ, दहिवडी, अंजनी गावांना काल (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास पाऊस व गारपिटीने चांगलेच झोडपले. ही गारपीट पंधरा ते तीस मिनिटे सुरू होती. यामुळे द्राक्षबागांची छाटणी करून फुटलेल्या काड्या मोडून पडल्या. तर काड्यांना गारांचा मारा बसत मोठ्या जखमा झाल्या आहेत. मार व जखमा झालेल्या या बागांना द्राक्षे न येण्याचा मोठा धोका आहे. या गारपिटीने तालुक्यातील सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे.
डोंगरसोनीसह पूर्व भागातील परिसरात पाण्यासाठी चालुवर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी टँकरने पाणी घालून द्राक्षबागा जगवण्यासाठी प्रयत्न करत आहे. उच्च प्रतीची द्राक्षशेती करणारा इथला शेतकरी पाण्याने हतबल आहे. पाणी विकत घालायचे परवडत नसल्याने काही जणांनी बागा तोडुन टाकल्या तर काहींनी छाटणीच घेतली नाही. ज्या बागा सध्या आहेत, त्या बहुतांश बागांसाठी टँकरनेच पाणीपुरवठा केला आहे. पाण्यावर द्राक्षबागा फुटून काड्या व्हायची वेळ आली असताना मंगळवारी अवकाळीने बागांवर घाला घातला. पूर्व इतिहास पाहता गारांचा मारा बसलेल्या बागांना द्राक्षे आले नाही. आता जखमी काड्यांना द्राक्षे येतील याची खात्री नसल्यामुळे शेतकरी हबकला आहे. बागांवर पुन्हा दुबार छाटणीची टांगती तलवार आहे.