सांगली - कर भरा आणि बक्षीस मिळवा, अशी अजब योजना सांगलीच्या एका ग्रामपंचायतीने जाहीर केली आहे. थकबाकीच्या वसुलीसाठी सांगलीच्या अंकलखोप ग्रामपंचायतीने कर न भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी हा"लकी ड्रॉ"चा फंडा काढला आहे. ज्यामध्ये थेट सोन्याच्या दागिन्यांसह गृहोपयोगी वस्तूंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
मार्च महिना सुरू होत आहे, त्यामुळे सर्वच संस्थांची थकबाकी वसुलीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मार्च एन्डपर्यंत वसुली करणे हे मोठे आव्हान असते, त्यामुळे वसुलीसाठी संबंधित संस्थेकडून साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच गोष्टींचा उपयोग करण्यात येतो. मात्र तरी देखील बऱ्याचवेळेस वसुली होत नाही. त्यामुळे अंकलखोप ग्रामपंचायतीने वसुलीसाठी नवा फंडा उपयोगात आणला आहे.
कर भरा आणि बक्षीस मिळवा
कितीही प्रयत्न केले तरी पूर्ण थकबाकीची वसुली होत नाही, हा अनुभव अंकलखोप ग्रामपंचायत प्रशासनाला दरवर्षी येत होता. त्यामुळे गावात विविध विकास कामांसाठी निधी कमी पडत होता. गेल्या 2 वर्षांपासून अंकलखोप गावाच्या वसुलीला फटका बसला आहे. 2019 मध्ये महापूर, त्यानंतर कोरोना लॉकडाऊन अशा संकटांमुळे वसुली होऊ शकली नाही. त्यामुळे आता कर भरण्यासाठी ग्रामस्थ स्वतःहून पुढे येतील अशी अभिनव योजना ग्रामपंचायतीने शोधून काढली आहे. थकीत कर भरणाऱ्या गावकऱ्यासाठी 'लकी ड्रॉ' योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील प्रथम विजेत्याला बक्षीस म्हणून सोन्याची अंगठी मिळणार आहे, तर इतर विजेत्यांना संसार उपयोगी साहित्य मिळणार आहे. या योजनेचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. सोन्याची अंगठी, टिव्ही, फ्रिज, फॅन अशा सुमारे 25 वस्तुंचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.