सांगली - गणेशाच्या आगमनाला २ दिवसांचा अवधी बाकी असला तरी सांगलीमध्ये मात्र गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. 'चोर गणपती' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गणेशाची, गणपती संस्थांच्या गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कोणताही गाजावाजा न करत आज पहाटे भक्तिमय वातावरणात पूजा करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची पाऊणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. ती आजतागत कायम आहे.
सांगलीचे आराध्य दैवत म्हणून गणरायाची ओळख आहे. संपूर्ण सांगलीकरांची या गणेशावर मोठी श्रद्धा आहे. सांगली गणपती पंचायतन तर्फे दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. सांगली संस्थांचे राजे पटवर्धन यांनी गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु केली आणि दरवर्षी सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून हा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गणपती पंचायतन ट्रस्टकडून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. मात्र गणपती पंचायतन मध्ये त्याआधी दोन दिवस अगोदरच गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते आणि या प्रथेला 'चोर गणपती' म्हणून संबोधले जाते. सांगलीमध्ये मागील पाऊणे दोनशे वर्षाहून अधिक काळापासून ही परंपरा सुरु आहे. आज पहाटे गणेश मंदिरात प्रथेप्रमाणे या चोर गणपतीचे आगमन झाले आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरातील मुख्य गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला चोर गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गणपतीचे विसर्जन होत नाही. या चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली जाते. दीड दिवसानंतर हे चोर गणपती सुखरूप ठिकाणी हलवण्यात येतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला या चोर गणपतीचे प्रतिष्ठापणा करण्याची ही परंपरा असून आजही मोठ्या भक्तीने जोपसण्यात येत आहे.
चोर गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे मोठं संकट आहे. त्यामुळे गणपती पंचायतन ट्रस्टकडून साध्या पद्धतीने गणेशोत्सव यंदा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी गणेशाचे आगमन आणि विसर्जन शाही मिरवणुकीने करण्याची परंपरा आहे. तसेच या ठिकाणी पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो आणि गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळा पाहण्यासाठी अनेक राज्यातील हजारो भाविक येतात. मात्र सर्व मिरवणूक आणि कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, मागील पाच महिन्यांपासून गणपती मंदिर भाविकांसाठी बंद आहे. मंदिरातील पुजारी यांच्याकडून दररोज या ठिकाणी पूजा केली जाते.