सांगली - लॉकडाऊनमध्ये फळ विक्रीच्या आडून दारू विक्री केल्याची घटना सांगलीमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी एका फळ विक्रेत्याला अटक झाली आहे. त्याच्याकडून 28 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. सांगली महानगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.
रस्त्यावर सुरू होती दारू विक्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून यामध्ये भाजीपाला आणि फळ विक्रीचा समावेश होतो. याचा फायदा घेत एक फळ विक्रेता पोत्यातून देशी दारू विक्री करत होता. सांगलीच्या विश्रामबाग येथील चिनार हॉटेल शेजारी ही दारू विक्री केली जात होती. याची माहिती मिळताच पालिकेच्या पथकाकडून तपासणी केली गेली. पालिकेच्या पथकाला एका पोत्यात देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. याची माहिती विश्रामबाग पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या जप्त करून फळ विक्रेत्याला अटक केली, अशी माहिती मनपा अधिकारी एस एस खरात यांनी दिली.