सांगली- जिल्हा कारागृहतील आणखी 40 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कारागृहातील कोरोना रुग्णसंख्या 124 झाली आहे. एक आठवड्यापूर्वी कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कैद्यांची टेस्ट सुरू करण्यात आली होती. सांगली जिल्हा कारागृहातील कोरोनाचा फैलाव वाढला असून आणखी 40 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 ऑगस्ट रोजी कारागृहातील 63 कैद्यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे कारागृह आणि जिल्हा प्रशासन हादरून गेले होते.
कारागृहात सुमारे तीनशेहून अधिक कैदी एकत्र असल्याने कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांच्यामुळे इतर कैद्यांनाही कोरोना लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. कारागृह प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोरोना बाधित कैद्यांचे विलगीकरण आणि संपर्कातील कैद्यांची टप्प्या-टप्प्यांनी टेस्ट करण्यात येत होती.
तीन दिवसांपूर्वी आणखी 21 कैद्यांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी दीडशे जणांची टेस्ट दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती आणि यातील तब्बल 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे,त्यामुळे जिल्हा कारागृहातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 84 वरून 124 वर पोहोचली आहे.