सांगली - केंद्र आणि राज्य सरकारचे भांडण म्हणजे दोन श्वानांमधील भांडणाचा प्रकार असल्याची टीका, माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी केली आहे. तसेच राज्यात जलसंपदा खात्यात वीज खासगीकरणाचा सर्वात मोठा घोटाळा झाला आहे,असा खळबळजनक आरोपही शेट्टी यांनी केला आहे,ते सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्र अन् राज्य सरकारवर टीका - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर जलसंपदा खात्यात वीज खासगीकरणामध्ये मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. शेट्टी म्हणाले, देशामध्ये सर्वात जास्त घोटाळे हे गुजरातमध्ये होत आहेत. अशातच घोटाळेबाजांची चौकशी करण्याऐवजी ईडी आणि सीबीआय मंडप डेकोरेटर्सची चौकशी करत आहेत. सरकारी यंत्रणा एका पक्षाशी एकनिष्ठ काम करत असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका शेट्टी यांनी केली.
विज खासगीकरणात मोठा घोटाळा - तसेच राज्यात साखर घोटाळ्यापेक्षा जलसंपदा खात्यातील वीज प्रकल्प खासगीकरणाचा घोटाळा मोठा आहे. भाजपचे धोरण होते, तेच या महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. जलसंपदा, महापारेशन आणि महाजनकोचे ऑडिट करा, राज्यातल्या सहा विद्यूत प्रकल्पांच्या खाजगीकरण करण्याचा घाट घातला असून खासगीकरण करण्यामाग कोणाचा हात आहे, हे आता कळले पाहिजे. सध्या १ रुपये प्रति युनिट वीज खरेदी करावी लागत आहे. मात्र, खासगीकरण झाल्यास सहा रुपयांनी वीज खरेदी करावी लागणार असून खासगी कंपन्यांची वीज खपवण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारी वीज प्रकल्प बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करत वीज प्रकल्प घेणाऱ्या खासगी कंपन्या या राज्यातील नेत्यांच्या आहे. या घोटाळ्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Water Resource Minister Jayant Patil ) यांची असल्याचे आरोपही शेट्टी यांनी केले आहे.
हे, तर दोन श्वानांचे भांडण - पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर दोन श्वानांचे भांडण सुरू असते आणि त्याला सोडवायला गेलेल्या वारकऱ्यांच्यावर ती श्वान हल्ला चढवतात आणि वारकऱ्यांच्या हातातील भाकरीचे गाठोडे पळवून नेतात, अशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सर्व सामान्यांचे प्रश्न बाजूला राहावेत यासाठी हे सर्व सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
हेही वाचा - शिवसेना, हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकत आहे - जयंत पाटील