सांगली - शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सकाळी ७ वाजता ५६.१० फुटांवर पोहोचली. यामुळे शहरात पुराचा विळखा वाढत चालला आहे. शहरासह नदीकाठच्या गावात अद्यापही हजारो नागरिक अडकले आहेत. तर महापुरापुढे जिल्हा प्रशासनाची आपत्ती यंत्रणा कोलमडून पडली आहे. प्रशासनाच्या संपर्क यंत्रणेसह बोटीसुद्धा बंद पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील टिम्बर एरिया, कॉलेज कॉर्नर, जिल्हाधिकारी निवासस्थान, आंबेडकरी रोड, शंभरफुटी रस्ता, डी-मार्टपर्यंत पाणी घुसले आहे. आतापर्यंत वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातील जवळपास ९० हजारहून अधिक व्यक्ती व २२ हजारहून अधिक जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर यापैकी सुमारे ६७ हजार नागरिकांचे प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी लष्कराचे जवान, एनडीआरएफची टीम युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. त्यांच्या मदतीला कोस्ट गार्ड पथकही दाखल झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढाव घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला महापुरामुळे सांगली शहरातील दूध, सिलेंडर, भाजीपाला, एटीएम सेंटरवर परिणाम झाला आहे. या पुरामुळे दूध, सिलेंडर, भाजीपाला यासारख्या गृहोपयोगी वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तर शहरातील सर्व बँकांचे एटीएम बंद पडले आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.