सांगली - पावसाचा जोर मंदावल्याने गेल्या तीन दिवसांपासून कृष्णा नदीची वाढणारी पाणी पातळी मंगळवारी सायंकाळी स्थिर होऊन एक इंचाने उतरली आहे. तर मिरज, नागठाणे, भिलवडी या ठिकाणीही कृष्णा नदीची पातळी ओसरू लागली आहे. पाण्याच्या पातळीत घट होऊ लागल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू होती. त्याचबरोबर कोयना धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली होती. मंगळवारी सायंकाळी 5 पर्यंत पाण्याची पातळी 39.01 फुटांवर पोहोचली. त्यानंतर पाण्याची वाढ थांबून पातळी स्थिर झाली होती. मात्र, पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे नदीच्या पूर पट्ट्यात असणाऱ्या दत्तनगर, काका नगर, साईनाथ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट आणि कर्नाळा रोड याठिकाणी असणाऱ्या शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं.
पाण्याची वाढती पातळी पाहता कृष्णाकाठी भितीचं वातावरण होतं. पुन्हा महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची भिती होती. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या शेकडो नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारपासून पावसाचा जोर मंदावलाय. मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने सांगलीच्या आयर्विन पूल याठिकाणी 1 इंचाने आणि मिरजेच्या कृष्णा घाटावर 1 फुटाने पाणी पातळी घटली आहे. त्याचबरोबर नागठाणे, भिलवडी आणि अमनापूर याठिकाणी कृष्णा नदीची वाढती पाण्याची पातळी स्थिर होऊन कमी झाली आहे. झपाट्याने वाढलेल्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी संथ गतीने ओसरू लागल्याने कृष्णाकाठच्या नागरिकांसोबत प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.