सांगली - वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील तुकाराम गायकवाड यांच्या शेतात शेळीपालक गणेश वाघमोडे यांनी शेळ्या बसवल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. या पाच शेळ्या मृत्यू तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत. तसेच बिबट्याने एक शेळी पकडून नेली असल्याची माहिती, शेळीपालक गणेश वाघमोडे यांनी दिली.
हेही वाचा... हृदयद्रावक : मुलाची 'ती' आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही
वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथेल तुकाराम गायकवाड यांच्या शेतामध्ये चार दिवसांपासून गणेश वाघमोडे यांनी आपल्या शेळ्या बसवल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे गणेश यांनी सर्व शेळ्या कंपाउंडच्या आत बंदिस्त केल्या. त्यानंतर ते जेवण करण्यासाठी घरी गेले होते. यानंतर ते शेतावर परत येईपर्यंत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढवला होता. यात पाच शेळ्यांचा मृत्यू झाला होता. तर चार शेळ्या जखमी अवस्थेत होत्या. तसेच एका शेळीला बिबट्याने सोबत नेल्याचेही दिसून आले.
हेही वाचा... पाकिस्तानामध्ये रेल्वे आणि बसचा भीषण अपघात; 30 जणांचा मृत्यू
दरम्यान मागील आठवड्यातही अशाच प्रकारे शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यावेळी राखणीसाठी असलेल्या कुत्र्याला बिबट्याने गंभीर जखमी केले होते. गणेश वाघमोडे यांच्या बकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी वनविभागाचे अधिकारी पाटवळे, ग्रामसेवक, गावचे सरपंच यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि पंचनामा केला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उदय गायकवाड, वर्धमान बुद्रुक, सुनील गायकवाड, सागर शिंदे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.
या घटनेमुळे ऐतवडे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ग्रामस्थांनी परिसरात असणाऱ्या बिबट्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाला केली आहे. तसेच वनविभागाकडून कोणतेही पाऊल न उचलल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वनविभागाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्वाभिमानीचे नेते उदय पाटील यांनी सांगितले.