सांगली - नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खोल विहिरीत ही गाडी पडली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाल आहे. सांगलीच्या आटपाडीच्या झरे-पारेकरवाडी दरम्यान हा अपघात झाला.
हेही वाचा - VIDEO : पुण्यात भरधाव दुचाकीची पीएमपीला धडक, तरुणाचा मृत्यू
आटपाडी तालुक्यातील पारेकरवाडी येथील सहा जण आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गाडीने चितळी येथे निघाले होते. पारेकरवाडीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ते पोहचले असता, अचानक व्हॅगनार गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले आणि गाडीवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर गाडी थेट रस्त्याच्या कडेला असणाऱया खोल विहिरीत जाऊन कोसळली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दरवाजे न उघडता आल्याने गाडीतून बाहेर पडता न शकल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये मच्छिंद्र पाटील (वय ६०), कुंडलीक बरकडे (वय ६०), गुंडा डोंबाळे (वय ३५), संगीता पाटील (वय ४०), शोभा पाटील (वय ३८) यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. तर, गाडीत असणारे हरिबा वाघमारे हे गाडीच्या काचा फोडून बाहेर आल्याने ते वाचले.
घटना समजताच, झरे-पारेकरवाडी व परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. यानंतर जेसीबीच्या मदतीने व्हॅगनार गाडी बाहेर काढण्यात आली. रविवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे.