सांगली - सांगलीच्या ५ जिगरबाज सायकलपटूंनी सांगली ते कन्याकुमारी, असा सायकल प्रवास पूर्ण केला आहे. या मोहिमेत प्लॅस्टिक वापरू नका आणि सायकल चालवा हा संदेश त्यांनी दिला आहे. नुकतीच ही मोहीम फत्ते करून परतलेल्या या सायकलपटूंचे त्यांच्या कर्नाळ या गावी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - 'चार वजा तीन'... राष्ट्रवादीचे 3 आमदार स्वगृही
सांगलीतील कर्नाळ गावच्या जिगरबाज सायकलपटूंनी सांगली ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून दहा दिवसात पूर्ण केला आहे. अवघ्या दहा दिवसात १३६० किलोमीटरचा सायकल प्रवास करत "SAY NO TO PLASTIC" आणि सायकल चालवा फिट रहा, असा संदेश या प्रवासाच्या माध्यमातून या सायकलपटूंनी दिला आहे. या सर्व सायकलपटूंचे नुकतेच सांगलीत आगमन झाले. यावेळी कर्नाळ गावी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल, ताशे, हलगीच्या वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत तसेच रांगोळी काढून त्यांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढली १३६० किमीचा सायकल प्रवास यशस्वी केल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले.
हेही वाचा - पवार निघाले कराडला...
या सायकल मोहिमेत कर्नाळ येथील रावसाहेब मोहीते (५९), संदेश कदम (५४), अमोल पाटील (३४), राजू पाटील (४४) आणि प्रभाकर आंबोळे (६१) यांनी हा प्रवास १ नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता कर्नाळ येथील ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेऊन सुरू केला होता. दररोज १३० ते १५० किमी सायकल प्रवास करत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या तीन राज्यातून प्रवास करत हा टप्पा पार केला. सलग नऊ दिवस प्रवास करत दहाव्या दिवशी सकाळी ११ वाजता ते कन्याकुमारी येथे पोहोचले.
हेही वाचा - अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा
दरम्यान, हा सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या ग्रुपने भविष्यात याहीपेक्षा जास्त अंतराची सामाजिक संदेश घेऊन सायकल मोहीम करण्याचा संकल्प यावेळी केला आहे.