सांगली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दहीहंडी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयानंतर एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे. दहीहंडी खेळणाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण वाटण्याची खैरात म्हणजे दिवाळखोरीचे लक्षण आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी नेते अजित नवले Farmer leader Ajit Navale यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तसेच अशिक्षित आणि दिवाळखोर लोक सत्तेत आल्यावर सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी कसा खेळ करतात. याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीकाही नवले यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची पोरं सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी जीवाचे रान करतात. एक एक गुण मिळावेत यासाठी आपला जीव पणाला लावतात. तर दुसऱ्या बाजूला अशी स्पर्धा लावायची आणि कोणी मागणीही केलेली नसताना. दहीहंडी खेळणाऱ्या पोरांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा करायची, तसेच राज्यातला मराठा समाजातला शेतकरी शेती अडचणीत आल्यामुळे आरक्षणाची मागणी करतोय त्याच पद्धतीने इतर समाजही आरक्षणाची मागणी करतोय. मात्र त्याला तांदळाच्या अक्षता लावायच्या. पण आता विठू-दांडी खेळणाऱ्यांना, गोट्या खेळणाऱ्यांना आणखी काही खेळणाऱ्यांना नोकरीच्या आरक्षणाच्या खैरात वाटण्याचा भाषा करायच्या, हे म्हणजे दिवाळखोरीचे लक्ष असून अशिक्षित आणि दिवाळखोर लोक सत्तेत आल्यावर सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी कसे खेळ करतात. याचे उत्तम उदाहरण आहे, अशी टीकाही अजित नवले यांनी केली आहे.