वाळवा (सांगली) - तालुक्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काळमवाडी येथील काळम्मादेवी व नेर्ले येथील भैरवनाथ मंदिरातील अनेक वर्षांपासून चालत आलेला इंगळ चालण्याचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. शनिवार (दि.२४) तारखेचा इंगळ चालण्याचा होणारा कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याचे कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले, ते पत्रकारांशी बोलत होते.
कोरोनामुळे अनेक वर्षांची नेर्ले व काळमवाडी येथील इंगळावरून चालण्याची परंपरा खंडित झाली आहे. काळमवाडी येथे पुरातन काळातील काळम्मादेवीचे स्वयंभू अधिष्ठान आहे. परदेशातून व महाराष्ट्र, कर्नाटकातून अनेक भाविक दरवर्षी काळम्मादेवीच्या दर्शनासाठी येत असतात. दसऱ्याच्या निमित्ताने परंपरेनुसार काळम्मादेवीच्या मंदिरासमोर दुपारी बारा वाजता लाकडे पेटवून इंगळ पाडले जातात व येथील तलावात अंघोळ करून इंगळावरून चालतात."काळूबाईच्या नावानं चांगभलं" असा जयघोष केला जातो. हजारो भाविक चालतात. कोरोनामुळे भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काळमवाडीचे शनिवारी होणारे दसऱ्याचे इंगळ होणार नाही. त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केले आहे. येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. मुंबई, पुणे, ठाणे, कर्नाटक आदी भागातून अनेक भाविक इंगळावरून चालण्यासाठी येतात.
- राज्य-परराज्यातून येतात नागरिक
नेर्ले येथील भैरवनाथ व जोगेश्वरीचे मंदिरदेखील पुरातन काळातील आहे. येथे मोठी यात्रा असते. पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, कराड, कर्नाटकमधील हुबळी, चिक्कोडी, बेळगाव आदी भागातून भाविक येतात. माने गल्ली येथील भैरवनाथाच्या विहिरीमध्ये भाविक आंघोळ करून "भैरुबाच्या नावानं चांगभलं!" म्हणत लालबुंद झालेल्या विस्तवावर चालतात. यावेळी गाभाऱ्यात असलेल्या भैरवनाथाच्या मूर्तीला घाम फुटतो, असे पुजारी सांगतात. इंगळाचा उत्सव हा पाहण्यासारखा असतो. काळमवाडी व नेर्ले परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांच्या परंपरेला खंडन पडले असून भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- इंगळावरून चालण्याची ७०० वर्षांची परंपरा
कोरोनामुळे खंडित झाली आहे. नवरात्रौत्सवात महिलांचा सहभाग मोठा असतो. काळमवाडी व नेर्ले परिसरातील महिलादेखील इंगळवरून चालतात. इंगळावरून चालल्याशिवाय उपवास सोडला जात नाही. ही दोन्ही मंदिरे सध्या बंद आहेत.