सांगली - भाजपाकडे ईडी ,सीबीआय,इन्कम टॅक्स तीन कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सहाय्यानेच भाजप- सेनेत मेगा भरती सुरू आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. पूरग्रस्तांना मदत देण्यामध्ये सरकार केवळ टाईमपास करत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे.
ज्या लोकांनी घोटाळे केले, जनतेचे पैसे बुडवले ते भाजपा आणि शिवसेनेत गेले. त्यांना मात्र कोणताही त्रास दिला जात नाही किंवा त्यांची चौकशी होत नाही. असा टोला शेट्टींनी भाजपला लगावला आहे. भाजपला निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास तर ते का घाबरता, ईव्हीएम मशीनऐवजी मत पत्रिकेवर निवडणूका घ्या म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, अशा शब्दात त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे.
महापुरावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेट्टी म्हणाले, "सांगली, कोल्हापूरमध्ये जनता महापूरात गटांगळ्या खात होती, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत भाषण करत होते. कोल्हापूर, सांगलीचा पूर ओसरल्यानंतर ते पोहोचले" कोणालाच या महापुराचे गांभीर्य नव्हते, असे मत शेट्टींनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलनादेखील केली. 2005 मध्ये आलेल्या महापुरावेळी हवामान खराब असतानासुद्धा विलासराव देशमुख स्वतः तातडीने कोल्हापूर-सांगली मध्ये पोहोचले होते. परिस्थिती लक्षात घेऊन अलमट्टी येथील पाणी सोडण्याबाबत केंद्र सरकार पुढाकार घेऊ शकत असल्याने त्यांनी सोनिया गांधी यांना या ठिकाणी आणले होते. त्यामुळे बरेच प्रश्न सुटले होते. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मात्र केवळ कर्नाटकात महापुराची हवाई पाहणी करून गेले, त्यांना महाराष्ट्रातील पूर दिसला नाही असा आरोप त्यांनी केला आहे.