सांगली - खानापूर येथे अवकाळी पाऊसासह गारपीट झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक झालेल्या या गारपिटीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार हबकले आहेत. मागील वर्षी अतिवृष्टीसारख्या संकटावर मात करून पिकवलेल्या द्राक्षबागा हाता तोंडाशी आलेल्या असताना बुधवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावरील खानापूर, बेनापूर, हिवरे, सुलतानगादे परिसरात हलकी गारपीट झाली आहे.
हेही वाचा - अमरावतीत गारपीट; राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली पिकांच्या नुकसानीची पाहणी
अवकाळी पावसाने निर्यातक्षम द्राक्षबागांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खानापूर परिसरात गेल्या पाच ते सात वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. मात्र, अवकाळी पावसात गारा पडण्याचे प्रमाण या दोन ते तीन वर्षांत वाढले आहे. द्राक्ष काढणी हंगाम आणि अवकाळी पाऊस हे समीकरण बनल्याचे चित्र या पावसामुळे बनले आहे. बुधवारी सायंकाळी खानापूर, बेणापूर, हिवरे, सुलतानगादे परिसरात हलकी गारपीट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा तडाखा खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्षबागा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांना बसला आहे.
खानापूर घाटमाथ्यावर सध्या द्राक्ष हंगाम जोरात सुरू असून, निर्यातक्षम द्राक्षांसह स्थानिक बाजारपेठेसाठीच्या द्राक्षांची काढणी सुरू आहे. सध्या हा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, शेकडो एकर द्राक्षे निर्यात होणार आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडात पाणी साठून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शेतकरी हबकला आहे.