सांगली - श्वान शेतात राबतो, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. आश्चर्य करायला लावणारा हा श्वान कडेगावच्या हिंगणगाव बुद्रुक येथील एका शेतात आपल्या मालकाला प्रत्येक कामात हातभार लावत आहे. मालकाचा प्रत्येक शब्द चुटकीसरशी ऐकतो रॉकी, असे त्या श्वानाचे नाव आहे. सध्या गावात 'रॉकी भाई'ची जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रामाणिक श्वान म्हणजे रॉकी
कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक या ठिकाणी राहणाऱ्या निवृत्त सैनिक हणमंत कदम यांच्या घरी चार महिन्यांचा श्वान आहे. त्याचे नाव आहे "रॉकी. या रॉकीचा लळा कदम कुटुंबातील सर्वांना लागला आहे. त्यामुळे कदम कुटुंबाचा एक सदस्य म्हणून रॉकी कदम कुटुंबात वावरतो. सर्व काही अगदी प्रामाणिक इमाने-इतबारे आहे. अनेक हिंदी-मराठी चित्रपटात ज्या पद्धतीने प्रामाणिक श्वानाला दाखवले जाते, त्याचप्रमाणे रॉकी कदम कुटुंबासोबत वागतो.
मालकाच्या प्रत्येक कामात रॉकीचा हातभार
हनुमंत कदम यांनी, रॉकीला घराच्या राखणदारीसाठी पाळले होते. मात्र, रॉकी आता घरची राखणदारीचं नव्हे तर आपल्या मालकाच्या प्रत्येक कामात हातभार लावतो. मग ते घरातील काम असो किंवा शेतातील काम, तसेच कदम यांच्यासोबत त्यांचा पाठीराखा म्हणून रॉकी हा नेहमीच असतो. कदम यांना शेतातील प्रत्येक कामात रॉकी हातभार लावतो. सध्या कदम यांच्या शेतात पाण्यासाठी ठिंबक पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामातही रॉकीचे श्रम पाहायला मिळत आहेत. अगदी काही वेळात शेताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रॉकी पाईप पोहोचवण्याचे काम करतो. ज्यामुळे कदम यांचा वेळ आणि श्रमही वाचत आहे.
रॉकी बनलाय कुटुंबाचा सदस्य
रॉकी बाबत हणमंत कदम म्हणाले, गावापासून आपले घर थोडे दूर आहे. त्यामुळे आपण घराच्या राखणदारी करण्यासाठी श्वान पाळायचे ठरवले. एक पिलू आणले, त्याचे नाव रॉकी असे ठेवले. लहानपणापासून त्याला अगदी घरच्या सदस्याप्रमाणे आम्ही पाळला. त्यामुळे आता आम्हाला त्याचा आणि त्याला आमचा लळा लागला आहे. जी गोष्ट त्याला सांगतो तिथे करत असतो एखादी वस्तू आणायला सांगितली तर तो अचूक आणून देतो. शेतातही तो माझ्या सोबत प्रत्येक क्षण असतो. इतकेच नव्हेतर शेतातील कामंही करू लागला आहे. ठिंबक पाईप टाकण्याच्या कामातही रॉकी मदत करतो. पाईप घेऊन त्याला दुसऱ्या टोकाला जा म्हटले की, तो क्षणात पाईप दुसऱ्या टोकाला पोहोचून पुन्हा परत येऊन पुढचा आदेश येईपर्यंत थांबतो. त्याच्या या कामामुळे आपल्याला मोठी मदत होत आहे. प्रत्येक कामात रॉकीची आम्हाला मदत होते. त्यामुळे आता रॉकी आमच्या कुटुंबाचा सदस्य बनल्याचे कदम आवर्जून सांगतात.
मालकाच्या आदेशाचे तंतोतंत पालन
एकदा प्राण्याला माणसाचा लळा लागला तर तो प्राणी माणसाच्या प्रत्येक गोष्टींचे अनुकरण करतो, रॉकीचेही असेच आहे. मालकाची प्रत्येक गोष्टी रॉकीला कळते आणि आदेश येताच रॉकी त्याचे तंतोतंत पालन करतो.
हेही वाचा - सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश; निर्बंधात शिथिलता