सांगली - शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी सारखी पाऊस झाला आहे. त्यामुळे चांदोली धरणात 30 टीएमसी इतका पाणीसाठी निर्माण झाला आहे. दोन दिवसात चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झालेली आहे. एकूण 260 मिलिमीटर पाऊस चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडला आहे.
बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली आहे. 34.40 चाळीस टीएमसी इतके धरणाची साठवण क्षमता आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत धरणामध्ये 30 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला. तर धरणात मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची आवक या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपार पासून सहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येत होता. मात्र दुपारनंतर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी प्रमाणे पाऊस झाला. धरण प्रशासनाकडून रात्री आठनंतर विसर्ग आणखी वाढवून 22 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे.
हेही वाचा-SANGLI RAIN कृष्णा नदीचे पाणी शिरले नागरी वस्तीत; 15 कुटुंबाचे तातडीने स्थलांतर
वारणा नदी पात्राबाहेर, पूल,बांधरे पाण्याखाली..
संततधार पाऊस आणि चांदोली वारणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी सकाळपासून वारणा नदी पात्राबाहेर पडली असून मांगले-कांदे, सावर्डे, ऐतवडे खुर्द या ठिकाणावरील दोन पुल आणि सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा जवळचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर संततधार पाऊस आणि चांदोली धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गा यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर काही गावांतील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-पंचगंगेने मध्यरात्री ओलांडली धोक्याची पातळी; कोल्हापुरात महापुराचे संकट येण्याची भीती