सांगली - धनगर समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'ढोल बजाव' आंदोलन करत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील धनगर समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाचे गाजर दाखवण्यात आले आहे. मात्र, अद्याप सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, त्यामुळे आज धनगर समाज आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या वंचित आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी तातडीने धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावं, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने आज करण्यात आली.
हेही वाचा - दापोलीत तरुण शेतकऱ्याने केला काळ्या तांदळाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग
सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगरी वेशभूषेमध्ये पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवून धनगर समाजाला मंजूर झालेला एक हजार कोटींची निधी खर्च करण्यात यावा, त्याच बरोबर तरुणांना तातडीने एसटीचे दाखले देण्यात यावेत आणि वंचित असलेल्या या समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीही या 'ढोल बजाव' आंदोलनाद्वारे करण्यात आली.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्ष शर्मिला पाटील आणि शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने तातडीने धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक पावले उचलावीत. अन्यथा, यापुढील काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा या वेळी देण्यात आला.
हेही वाचा - 'स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी रामलीला उत्सवाला परवानगी द्यावी'