सांगली - जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला आहे. 21 जागांपैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवत जिल्हा मध्यवर्ती बँकेत वर्चस्व मिळवले आहे. भाजपाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला पराभव स्वीकारावा लागला आहे.
लागलेले निकाल
काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपाचे प्रकाश जमदाडे यांनी आमदार सावंत यांचा 45-40 मतांनी पराभूत केले आहे. तर मिरज सोसायटी गटात महाआघाडीचे विशाल पाटील हे 52-16 विरुद्ध मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपा पॅनेलचे उमेश पाटील यांचा पराभव केला आहे. आटपाडी सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील 40-29 मतांनी विजयी झाला आहे. त्यांनी भाजपाचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा पराभव केला आहे. तासगाव सोसायटी गटात महाआघाडीचे बी. एस. पाटील विजयी झाले आहेत. 41-23 मतांनी त्यांनी भाजपाचे सुनील जाधव व विद्यमान संचालक प्रताप पाटील यांचा पराभव केला आहे.
वाळवा सोसायटी गटात जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष महाआघाडीचे दिलीप पाटील 108-23 मतांनी विजयी झाली आहेत. त्यांनी भाजपचे भानुदास मोटे यांचा पराभव केला आहे. तर कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे 54-14 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे विठ्ठल पाटील यांचा पराभव केला आहे. कडेगाव सोसायटी गटात महाआघाडीचे आमदार मोहनराव कदम 53-11 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे तुकाराम शिंदे यांचा पराभव केला आहे. तर महिला राखीव गटात काँग्रेसच्या जयश्री मदन पाटील 1686 मतांनी आणि राष्ट्रवादीच्या अनिता सगरे या 1408 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या माजी महापौर संगीता खोत आणि दीपाली पाटील यांचा पराभव केला आहे. तर इतर मागासवर्गीय गटातून आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब व्होनमोरे हे 1528-548 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे रमेश साबळे यांचा पराभव केला आहे. तर मागासवर्गीय गटातून विकास आघाडीचे मन्सूर खतीब विजय झाले आहेत, त्यांनी भाजपाच्या रवी पाटील यांचा पराभव केला आहे.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या सी. बी. पाटील यांचा पराभव केला आहे. तर इतर भटक्या विमुक्त गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार चिमण डांगे हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे हे विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार तानाजी पाटील यांचा पराभव केला आहे. तर पतसंस्था गटातून भाजपाचे राहुल महाडिक आणि काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे विजयी झाले आहेत. याठिकाणी आघाडीचे किरण लाड आणि भाजपाचे चव्हाण यांचा पराभव झाला आहे. मजूर सोसायटी गटातून भाजपाचे सत्यजित देशमुख आणि जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा विजय झाला आहे. आघाडीचे काँग्रेसचे सुनील ताटे आणि हणमंत देशमुख यांचा पराभव झाला आहे.
17 जागा मिळवत बँकेवर वर्चस्व
अत्यंत चुरशीने याठिकाणी मतदान झाले होते. 85 टक्के मतदानाची नोंद झाली होती. महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi)ने भाजपा(BJP)चा दणदणीत पराभव केला आहे. 21 जागांपैकी 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 14 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या तीन जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. तर भाजपाला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने जिल्हा मध्यवर्ती बँके(istrict central bank elections)त वर्चस्व मिळवला आहे.
काँग्रेसचा आमदाराचा करेक्ट कार्यक्रम
काँग्रेसचे आमदार व सांगली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ऐनवेळी निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार घेणारे प्रकाश जमदाडे यांनी विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा याठिकाणी करेक्ट कार्यक्रम करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार विक्रम सावंत हे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मामा आहेत.
पक्षीय बलाबल - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक (महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा)
- राष्ट्रवादी काँग्रेस - 9
- काँग्रेस - 5
- शिवसेना - 3
- भाजपा - 4