सांगली - जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे सुमारे ३०० हेक्टरवरील द्राक्षे, ऊस आणि भाजीपाला पिकाची नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसात उर्वरीत पंचनामे पूर्ण करून अंतिम नुकसान अहवाल तयार होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या चार दिवसात गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि या नुकसानीचे पंचनामे सांगली जिल्हा कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले होते. तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे द्राक्षबागांचे झाल्याचे समोर आलेले आहे. तिन्ही तालुक्यांमध्ये जवळपास २६५ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.
मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे पिकलेल्या काडीचे पाने गळून पडले आहेत. त्यामुळे भविष्यात ही काडी पक्की न झाल्याने द्राक्ष शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १० हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला शेतीचे नुकसान झाले आहे, याशिवाय उसालाही गारपिटीचा फटका बसला आहे. सुमारे २५ हेक्टरवरील उसाचे क्षेत्र हे बाधित झाले आहे.
दरम्यान, बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवसात वादळी पावसाची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर आंबा, फुलशेती आणि इतर पिकांचे नुकसान झालेले आहे. युद्धपातळीवर पंचनामे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहेत आणि येत्या दोन दिवसात ते पंचनामे पूर्ण होऊन अंतिम नुकसानीचा अहवाल तयार होईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे.