सांगली- कृष्णा नदीमध्ये पोहण्यास गेलेल्या एका मुलावर मगरीने हल्ला केला आहे. मोठ्या धाडसाने मुलाने मगरीच्या तावडीतून सुटका केली. मात्र, यात तो गंभीर जखमी झाला आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सांगलीतल्या कृष्णा नदीतील एका मगरीने बुधवारी दहा वर्षाच्या मुलावर हल्ला केला. शहरातल्या माई घाटावर आपल्या मित्रांसमवेत तो पोहण्यासाठी गेला होता. धीरज राजू केवट असे त्या मुलाचे नाव आहे. मगरीच्या या हल्ल्यात धीरज याच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
धीरज हा दुपारच्या सुमारास आपल्या मित्रांसमवेत कृष्णा नदीत पोहत होता. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या एका मगरीने धीरज वर हल्ला केला. त्याचा पाय ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी धीरजने मगरीच्या जबड्यातून आपली सुटका केली. यात धीरज जखमी झाला असून त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे कृष्णा नदी काठावर पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.