सांगली - मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान सांगलीतील भाजप - शिवसेना गोंधळ प्रकरणी 20 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपाच्या आजी-माजी नगरसेवकांसह 12 जणांचा समावेश आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
हेही वाचा - मुंबईत सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार, मॉल अन् चित्रपटगृह बंदच - पालिका आयुक्त
मुख्यमंत्री दौऱ्यात भाजपा - शिवसेना आमने-सामने
पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली शहरातल्याही पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या दरम्यान हरभट रोड या ठिकाणी पूरग्रस्त व्यापारी व सामाजिक संघटनांकडून निवेदन स्विकारत होते. या दरम्यान मुख्यमंत्री हे भाजपकडून पूरग्रस्तांच्या मदतीच्या मागण्यांचे निवेदन न स्वीकारता निघून गेले, असा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत, घोषणाबाजी सुरू केली. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवत प्रत्युत्तरात घोषणाबाजी सुरू केली. यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर उभे ठाकत जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे, पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. अखेर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
भाजप कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हे दाखल
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळ प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सुमारे वीस जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये माजी उपमहापौर व नगरसेवक धीरज सूर्यवंशी, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, अमित भोसले, निलेश निकम, प्रथमेश वैद्य, राहुल माने, शांतीनाथ कर्वे, अश्रफ वांकर, प्रियानंद कांबळे, धनेश कातगडे, राजू जाधव, अमर पडळकर आणि सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांच्यासह अनोळखी सात जणांचा समावेश आहे. कोरोना नियमांच्या उल्लंघनासह, सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
हेही वाचा - ...म्हणून शरद पवारांनी अमित शाहंच केलं अभिनंदन; वाचा भेटीचं कारण