सांगली - शहरातील विजयनगर येथे सापडलेला कोरोना रुग्ण आणि त्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून तातडीने वैद्यकीय सर्व्हे सुरू करण्यात आला होता. मनपाच्या 42 पथकांकडून दोन दिवसात 64 हजार घरांचा सर्व्हे पूर्ण करत 24 हजार 853 लोकांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे .
सांगलीच्या विजयनगर मध्ये रविवारी एक बँक कर्मचाऱ्याला कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. तर शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासनाने आधिक गतिमान होऊन पाऊले उचलली होती. रविवारी पासून सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. ज्या साठी 42 आरोग्य पथके तयार करण्यात आली. विजयनगर या प्रतिबंधित क्षेत्रात 42 टीमच्या माध्यमातून रविवारी व सोमवारी दिवसभर सर्व्हे करण्यात आला.
या टीमसाठी मनपाचे वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, सिव्हिल सर्जन संजय साळुंखे, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. कोरे यांच्यासह 4 वैद्यकीय अधिकारी, 42 एएनएम , 42 आशा वर्कर तसेच पटेल चौक परिसरात 2 वैद्यकीय अधिकारी व 10 टीम असा एकूण 114 लोकांचा वैद्यकीय स्टाफच्या माध्यमातून प्रतिबंधित कार्यक्षेत्रात सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. ज्या मध्ये त्या प्रतिबंधित क्षेत्रातील 64 हजार घरांचा सर्व्हे करत 24 हजार 853 लोकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
या सर्व्हेमध्ये टीमकडून प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांना कोरोना सदृश्य तसेच सारी आणि आयएलआयची कोणती लक्षणे आहेत का याबाबत माहिती घेण्यात आली. या दोन दिवसांच्या सर्व्हेमध्ये कोरोना किंवा सारी आयएलआय सदृश्य लक्षणे कोणत्याही नागरिकाला मिळून आली नाहीत. मनपाच्या टीमकडून दोन दिवसात गतीने हा सर्व्हे पूर्ण करण्यात आला असून प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मनपाचे अधिकारी सुद्धा काम करत असून नागरिकांनी घरीच राहून सहकार्य करावे असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. तर विजयनगर या परिसरातील 5 किलोमीटरचे क्षेत्र हायकंटेमेंट व बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
तर सांगली-मिरज हा मुख्य रस्ता आणि विजयनगरचा परिसर हा पूर्णतः सील करण्यात आला आहे.