सांगली - सध्या कोरोना महामारीमुळे अनेक छोटे मोठे उद्याेग व्हेंटीलेटरवर आले आहेत. अनेक लोकांचे रोजगार गेलेत. वृत्तपत्र, साप्ताहिकाच्या संपादक आणि पत्रकारांची अवस्था या कोरोनामुळे दयनीय झाली आहे. तर ज्यांचा संसार या बातमीपत्रांवर अवलंबून आहे, असे संपादक-पत्रकार आता आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी चहा विक्री करू लागले आहेत. अशीच वेळ इस्लामपूर येथील द शिराळा न्यूज या साप्ताहिकाचे संपादक नवनाथ पाटील यांच्यावर आली आहे.
वीस वर्षांपूर्वी पत्रकार क्षेत्रात पाऊल
शिराळा तालुक्यातील गिरजावडे या गावचे रहिवासी असलेले नवनाथ पाटील यांनी वीस वर्षांपूर्वी पत्रकार क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी आतापर्यंत अनेक राज्य पातळीवरील नामंकित दैनिकात पत्रकार म्हणून काम केले आहे. मागील आठ वर्षांपूर्वी नवनाथ पाटील यांनी 'द शिराळा न्यूज' या नावाने साप्ताहिक सुरु केले होते. मागील सात-आठ वर्षात त्यांनी बातम्यांच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. यामुळे त्यांना जाहिराती मिळत गेल्या त्यावरच पाटील यांचा घरसंसार चालू होता.
पत्रकार, संपादकीय काम बाजूला ठेऊन चहा विक्री
मागील वर्षांपासून कोरोना आला आणि सर्व उत्सव, जत्रा, वाढदिवस, राजकीय कार्यक्रम बंद झाले. यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणाऱ्या जाहिरातीही बंद झाल्या. एक वर्ष कसेतरी निभावून नेले. पाच महिन्यांपासून कुठेतरी सुरळीत सुरु असताना, आता पुन्हा लॉकडाउन लागला आणि सर्व उत्सव, कार्यक्रम बंद झाले. यामुळे आता नवनाथ पाटील यांना आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पत्रकार, संपादक हे पद बाजूला ठेऊन इस्लामपूर येथील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चहा विक्री करावे लागत आहे. चहा विक्रीसुद्धा रोज होते असे नाही, कधी दहा तर कधी चारच कपांची ऑर्डर मिळत आहे.
'कोण होतास तू... काय झालास तू...'
रुग्णालयात जाऊन चहा देण्यासाठी त्यांना जीवावर उदार होऊनच काम करावे लागत आहे. यातून घरातील खर्च व खोली भाडे भागत नसल्याने सध्या पाटील यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्या - वाईट घटनांच्या वार्तांकनासाठी जीवाची पर्वा न करता पत्रकार सर्वात पुढे असतात. मग त्याच पत्रकारांवर उपासमारीची वेळ आल्यावर हे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांना मदत करण्यासाठी का पुढे येत नाहीत? असा सवाल पाटील यांच्या पत्नींनी उपस्थित केला आहे. कोरोनापूर्वी पत्रकार म्हणून समाजात वावरणारे अनेक जण सध्या भाजीपाला विक्री आणि तत्सम उद्योग-धंदा करुन रोजीरोटीचा प्रश्न सोडवत आहेत. तर काहीजण मजुरीचे काम करत आहेत. यामुळे 'कोण होतास तू... काय झालास तू...' अशी म्हणण्याची वेळ पत्रकारांवर आली आहे, असेही जयश्री पाटील यांनी सांगितले. यामुळे देशाचा चौथा स्तंभ टिकवायचा असेल तर शासनाने त्यांच्या परिने सर्व पत्रकारांना, संपादकांना मदत करण्याची नितांत गरज आहे असल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - 'बिल्डरांची सेटलमेंट, बदल्यांसाठी नेमला होता एजंट; पोलिस अधिकाऱ्यांकडून सोन्याच्या बिस्किटांची स्वीकारत भेट'