सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या १२ दिवसात ५० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल मिरजमध्ये तयार करण्यात आले आहे. या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या सुसज्ज हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पार पडला. अत्यंत कमी कालावधीत निर्माण झालेले, हे देशातील पहिलेच हॉस्पिटल असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बेड संख्या वाढवण्यात येत आहेत. त्यादृष्टीने सांगलीच्या मिरजेतील 'सेवासदन' हे हॉस्पिटल कोरोनाच्या संकटात प्रशासनाच्या मदतीला धावून आले आहे. सद्या सेवासदनमध्ये कोरोनासेंटर आहे. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ५० बेडसचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभा करण्याचा मानस प्रशासनाकडे व्यक्त केला होता. याला प्रशासनानेही तातडीने मान्यता दिली आणि १५ दिवसात हे हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन हॉस्पिटल प्रशासनाने केले होते. त्यानुसार युद्धपातळीवर हॉस्पिटलच्या शेजारी असणाऱ्या मालकीच्या जागेत हॉस्पिटलच्या निर्मितीची सुरूवात झाली. अवघ्या १२ दिवसात सुसज्ज असे हॉस्पिटल उभे करण्यात आले आहे.
२० बेडचा आयसीयू विभाग आणि ऑक्सिजनयुक्त ३० बेडची निर्मिती करण्यात आली आहे. रविवारी या सुसज्ज कोरोना सेंटरच्या ५० बेडसचे उदघाटन झाले आहे. जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या अत्याधुनिक हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि सेवसादनचे प्रमुख डॉक्टर रविकांत पाटील आदी उपस्थित होते. या सुसज्ज कोरोना हॉस्पिटलमुळे प्रशासनाला मदत होणार आहे. तर अवघ्या १२ दिवसात ५० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करणारे सेवासदन हे देशातील पहिलेचं हॉस्पिटल असल्याचा दावा सेवासदनचे प्रमुख डॉ.रविकांत पाटील यांनी केला आहे.