सांगली - चिकुर्डे येथील सुरेश शंकर पाटील आणि विजयकुमार शंकर पाटील या दोन भावांनी दीड लाख खर्चून दोन एकर क्षेत्रामध्ये भोपळा पिकाची लागण केली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे वाहतूक आणि मार्केट बंद असल्याने भोपळा पीक हे जाग्यावरच कुजले. त्यामुळे, त्यांना उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागला. यात शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
चिकुर्डे येथील पाटील बंधूनी आपल्या 955अ गटातील दोन एकर क्षेत्रात 1076 सेंच्युरियन या जातीच्या भोपळा पिकाची 13 जानेवारीला लागण केली होती. हे पीक 70 दिवसाचे असल्याने 25मार्चला याची तोडणी होणार होती. उन्हाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन कमी निघते यामुळे मार्च एप्रिल महिन्यामध्ये भाजीपाल्यांना चांगला दर मिळत असतो. यामुळे, पाटील बंधूनी अगोदर शेतात असणारे पीक काढून 13 जानेवारीलाच लागण केली. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन तर दीड लाख रुपये खर्च करून खत आणि औषधांची फवारणी करण्यात आली होती. यामुळे कमीत कमी 50टनाचे उत्पादन निघाले असते.
सध्या रासायनिक लागवडीचे दर गगनाला भिडले असल्याने शेती करणे म्हणजे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. काही वेळेस मालाला हमी भाव मिळत नाही. तर काही वेळेस मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दमछाक होते. अशात कोरोनामुळे पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या पिकावर नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवताना शेतकऱ्याला अक्षरशा काळजावर दगड ठेवावा लागतो.
पाटील बंधूंनी मुंबईला 9टन भोपळा ट्रकमधून पाठवला होता. परंतु, मुबंईमधील सर्वच हॉटेल्स बंद असल्याने व्यापाऱ्यांनी तो नाकारल्याने तो तिथेच टाकून द्यावा लागला. ट्रकचे पंधरा वीस हजार रुपये अंगावर आले. यामुळे, 40टन भोपळा पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागला. शासनाने पंचनामा करून योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.