सांगली - महापालिकेत आयुक्त विरुद्ध सत्ताधारी भाजपमध्ये वाद पेटला आहे. आयुक्त मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत रवींद्र खेबुडकर यांची तातडीने बदली करा, अशी मागणी महापौरांसह आमदारांनी केली आहे. या बदलीच्या मागणीसाठी भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. १०० कोटींच्या विकास कामांवरून हा वाद पेटला आहे. आयुक्त खेबुडकर हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत आयुक्त हटाव, अशी जाहीर भूमिका सत्ताधारी भाजपच्या महापौर, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यानी घेतली आहे. गुरुवारी सांगली महापालिकेत सत्ताधारी भाजपची पक्ष बैठक पार पडली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत येऊन सत्ताधारी गटाच्या पक्ष बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सर्वच पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आयुक्तांचा कालावधी संपल्याने त्यांची तातडीने बदली करावी अशी आग्रही मागणी केली.
या बैठकीनंतर आमदार सुधीर गाडगीळ यानी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना तातडीने बदलावे या मागणीसाठी महापौर आणि पदाधिकारी सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले. महापालिकेला अनुभवी आणि सक्षम आयुक्त मिळावा, अशी मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर सध्याच्या आयुक्तांच्या मानसिकतेमुळे शहरात विकास कामे थांबली असल्याने विकास कामाच्या आड येणाऱ्या आयुक्त खेबुडकर यांना तातडीने हटवा, अशी मागणी करणार असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.