सांगली - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही कोणी पुढे येत नाही. अगदी सख्खे नातेवाईकही आपल्या रुग्णाकडे पाठ फिरवत असल्याचा घटना समोर येत आहेत. मात्र, सांगली महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेला स्वतःला अग्नी दिली.
मिरजेत कोरोना रुग्णांच्या चितेला अग्नी देणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांपासून हे स्वच्छता निरीक्षक मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराचे काम करत होते. त्यांनी व त्यांच्या टीमने आतापर्यंत 300 हून अधिक कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले. हे काम करत असताना या स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आणि दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
'कोरोना योद्धा' म्हणून काम करणाऱ्या आपल्यातील एका कर्मचार्याचा मृत्यू आयुक्त नितीन कापडणीस यांच्या जिव्हारी लागला. कापडणीस हे आपल्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी थेटे कोरोना रुग्णांचे अंत्यविधी पार पडणाऱ्या पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत जाऊन पोहचले. त्यांनी स्वत: स्वच्छता निरीक्षकाच्या चितेला अग्नी दिला.
एक उच्चपदस्थ अधिकारी सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या अंत्यविधीलाही हजेरी लावतात का हा प्रश्न आहे? आणि जर कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनाने झाला असेल तर मग अशक्यच. मात्र, आयुक्त नितीन कापडणीस यांनी मृत्यू झालेला कर्मचारी आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याची जाणीव ठेवून चितेला अग्नी देत हे शक्य करून दाखवले आहे.