सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात आजपासून जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. दहा दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. मात्र याला जनतेने फारसा प्रतिसाद दिलेला नाही. व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला विरोध दर्शवत दुकाने सुरू ठेवली आहेत. त्यामुळे सांगलीकरांनी जनता कर्फ्यूच्या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबरपासून दहा दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना केले. मात्र, या जनता कर्फ्यूला सांगलीच्या स्थानिक व्यापारी संघटनांनी विरोध दर्शवला होता. तरीही, आजपासून जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. जनतेने स्वयंस्फूर्तीने व स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
सांगली महापालिका क्षेत्रामध्ये सुरू झालेल्या या जनता कर्फ्यूला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. व्यापाऱ्यांनी विरोध कायम ठेवत आपली दुकाने सकाळपासून नेहमीप्रमाणे उघडली आहेत.
हरभट रोड, कापडपेठ, मारुती रोड, सराफ कट्टा तसेच इतर प्रमुख बाजारपेठमधील सर्व व्यापार सुरळीत सुरू आहेत. नागरिकही खरेदी व इतर कामाच्या निमित्ताने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या जनता कर्फ्यूला सांगलीकर जनता आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने पहिल्याच दिवशी दिसून आले आहे. ग्रामीण भागात जनता कर्फ्यू जाहीर होण्याच्या आधीपासूनच अनेक गावात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळत आहे.